Wednesday, May 12, 2021

पारव्याची मसलत


वास्तविक पाहता मला ह्या कार्यक्रमात तिळमात्र इंटरेस्ट नव्हता. हैदराबाद वरून निघताना मी तसं ठाम सांगितलं होतं की एकही मुलगी पाहणार नाही. ह्या वेळेला फक्त सुट्टी करता येतोय. पण कसलं काय. पुण्यात पाय  ठेवतो न ठेवतो तेच बाबांनी सांगितलं कि संध्याकाळी बागवाडकर म्हणून आहेत ते येत आहेत. फक्त एकटे येत नाहीयेत तर त्यांची मुलगी पण येतीये. आता बागवाडकर का येणारेत आणि त्यांच्या मुलीचं  येण्यामागचं प्रयोजन काय हे विचारण्याची गरज नव्हती. पण मी सांगितलेलं ना बाबा कि ह्या वेळेला नको म्हणून. ठीके रे, एक पाहून घे. बरी वाटली तर बघू  पुढचं पुढं. सकाळी सकाळी स्टेशन वरून येताना फोन केल्या केल्या ह्याच बातमीनं पुण्यात माझं स्वागत झालं होतं. तसे माझे संध्याकाळचे सगळे प्लॅन्स ठरले होते. आता फोना-फोनी करून ते सगळं कॅन्सल करावं लागणार. शिवाय कारण विचारलं की, तुझं हे नेहमीच असतं शिऱ्या अशी सुरुवात करून माझी सविस्तर शाळा घेण्यात येणार यात काय शंका नव्हती. आपण स्वतः बायको समोर ताटाखालचं मांजर असूनही एरवी मित्रांसमोर ढाण्या वाघ म्हणून वावरणाऱ्या माझ्या ह्या मित्रांना हे काही नवीन नव्हतं. किंबहुना ह्या असल्या फोन कॉल्स ची हे लोकं तर अगदी डोळ्यात तेल घालून वाट बघणार. स्वतः सुद्धा हेच केलं होतं हे सोयीस्कर रित्या विसरणार. असो, मी ह्या वेळेला ठरवलं की फोन करायचाच नाही. ह्या वेळेला "ढग" द्यायचा. नंतर होईल ते होईल. बरं  वाटत नव्हतं, खूप दिवसांनी आलो म्हणून बाबा म्हंटले की घरीच थांब म्हणून आणि नेमका त्याच क्षणी फोन बिघडला हे आणि असे अनेक. 

मी दारावरची बेल वाजवली. 

"अरे मला खालून आवाज द्यायचास ना!, मी डोंगरे ला सांगितलं असतं ब्यागा तो वर घेऊन आला असता"

"ह्या वेळेला एवढं सामान नव्हतं आणि एरवी सुद्धा मी स्वतः ते आणू शकतो बरका"

हो! - बाबा म्हणाले

"हो" बाबांचा उपरोधिक हो परिचित होताच पण नित्यनेम चुकेल तर नवल 

"ते जाऊदे!, अहो ती बेल बदलून घ्याकी एकदा, किती वर्ष ती पक्षांच्या चिवचिवाटाची बेल वापरताय "

"शिऱ्या,आमच्यासाठी बेल चा वापर हा बाहेर एखादी व्यक्ती आलीये हे कळावं एवढाच आहे. शिवाय दररोज येणारी माणसं ठराविकच आणि त्यातली निम्मी तर कुलकर्णी कचरा, कुलकर्णी पेपर, ताई  भांडी,काका लॉंड्री  बेल न वाजवता आम्ही आलोय हे सांगणारी त्यामुळे कशाला आलीये ती बेल बदलण्याची गरज. तुला जर तसं  वाटत असेल तर तू आलायस ना आता तर घे बदलून. बरं पक्षांचा आवाज नको तर मग त्या ऐवजी काय हे ठरवल्यास का? एक काम कर - लता किंवा आशा च्या आवाजातलं एखादं गाणं बघ मिळालं तर." 

बाबा बोलत होते आणि मी ऐकत होतो. मी आल्याचा आनंद त्यांच्या त्या बोलण्यात अगदी ओसंडून वाहत होता. आई बाबांच पण नवल वाटतं. वास्तविक मी हैदराबाद ला जॉईन झाल्यापासून नित्य नेमाने गेली २ वर्ष अल्टर्नेट वीकएंड पुण्याला येत होतो. पण प्रत्येक वेळेला त्यांचा मी आल्याचा आनंद अगदी तिळमात्र कमी होत नसे. मी आल्यावर आई म्हणजे अगदी दिवाळी किंवा पाडवा का काय असल्यासारखं अगदी सविस्तर स्वयंपाक, बाबा सोसायटीमध्ये गेल्या दोन आठवड्यात काय घडलं ह्याचा सविस्तर वृत्तांत इनफॅक्ट आमच्या कामवाल्या मावशी सुद्धा "आणि या दोन आठवड्यात अजून काय काय घडलं" या सदराखाली आई आणि बाबा जे काही कव्हर करणार नाहीत ते सगळं अगदी अर्थ पासून इति पर्यंत कव्हर करत.
"एक काम कर - ते पिया तू अब तो आजा हे गाणं मिळतंय का बघ" बाबांच्या त्या बोलण्यानं मी एकदम भानावर आलो

ते ऐकून मी एकदम ध्यानावर आलो. 

"बाबा अहो बेल बदलणं म्हणजे तुमची रिंगटोन बदलण्यासारखं नाहीये काही" 

"असं होय. बरं बाबा. राहिलं " बाबानी ज्या युद्धात त्यांना काडीमात्र इंटरेस्ट नव्हता त्याची शस्त्र खाली टाकून चहाचा कप उचलला. तेवढ्यात "पेपर!" - असा बाहेरून आवाज. बाबानी हसून माझ्याकडं पाहिलं. 

मी सुद्धा "ठीके! तुमचं खरं. नका बदलू" असं म्हणून  दरवाज्याकडे कूच करून सकाळ उचलला. नित्यनेमाने मी क्रीडा आणि बाबा राजकारण अशी त्याची वाटणी करून आम्ही ते छापलेले शब्द खाऊ लागलो. तेवढ्यात - "पोहे तयार आहेत खाऊन घ्या" - आतून मातोश्रींनी वर्णी दिली. त्या क्षणी क्रीडा आणि राजकारण गेलं चुलीत ह्या आवेशात आम्ही स्वयंपाक घरात कूच केलं.

"शिर्या तुझं आंघोळीचं पाणी काढलंय. आज तुला मी आंघोळ घालणार काळवंडलायस केवढा. बघ जरा आरशात!. जरा घासून काढते आज म्हणजे कसं संध्याकाळी चांगला दिसशील. 

"हे तुझं काहीही हा आई. मला आंघोळ घालायचं काय माझं वय आहे का ?" मला आंघोळ घालण्यापेक्षा संध्याकाळी "चांगला" दिसशील म्हणून आंघोळ घालते ह्या वाक्यावर जास्त सटकलं होतं. 

"नको गं, मी करतो माझी"

"बरं, नीट कर. उगाच कावळ्याची आंघोळ करू नकोस" अशी दटावणी मिळाली. 

आईचं हे वाक्य काही नवीन नव्हतं आणि ह्यावर माझं सुद्धा "आई अगं कावळे आंघोळ करत नाहीत, जर ते आंघोळ करत असते तर काळे असते का?" हे रिस्पॉन्स म्हणजे लहान मुलं कशी कधी कधी अगदी निरागसपणे जगातल्या हजारो वर्ष चालत आलेल्या रूढी-परंपरांना चॅलेंज करतात आणि समोरच्याला गप्प  करायला पाडतात तशा स्वरूपाचं होतं पण आईला गप्प करायला ते पुरेसं होतं. तसं आई बाबांबरोबर एवढी वर्ष राहिल्यावर कुठल विषय लांबेल आणि कुठला तोडला जाईल ह्याची तशी चांगलीच सवय झाली होती. 

आंघोळी आटोपून टीव्ही चे चॅनेल चेंज करतो न करतो तेच, "जेवण तयार आहे थोड्या वेळात पानं घेऊयात" हे वाक्य ऐकताच, जर माझ्या अंघोळीच्या वेळात अगदी साग्रसंगीत स्वयंपाक होउ शकतो तर माझी आंघोळ नक्कीच हत्तीची किंवा रेड्याची असावी अशी गमतीदार कल्पना माझ्या मनाला चाटून गेली.  

मी सुद्धा सवयी नुसार जसा कुंबळे स्ट्रेट वन टाकायचा तसं "हे काय?, म्हणजे स्वयंपाक तयारे?" हे वाक्य टाकलं. आईनं ह्या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज आहे अशी काही जबाबदारी बाळगली नाही आणि ती तिच्या कार्यास सिद्धी प्राप्त करण्यात गुंतली.

हैदराबाद वरून आल्यावर जे माझं ठरलेलं रुटीन असतं. शनिवार दिवस आई-बाबांबरोबर, संध्याकाळ मित्र आणि रात्रीच जेवण पुन्हा घरी. रविवारी सकाळी ठरलेल्या ठिकाणी मिसळ, दुपारचं जेवण पुन्हा घरी आणि संध्याकाळी पुन्हा चकाट्या पिटायला बाहेर आणि रात्रीची ११:४५ च्या ट्रेन नि सकाळी ६:३० ला हैदराबाद मध्ये टच. हे नेहमीचं रुटीन असायचं तसं अगदी तंतोतंत चालू होतं. सकाळी पेपर-चहा-पोहे, दुपारी पोट फुटेपर्यंत जेवण आणि मग एक्सटेंडेड वामकुक्षी ह्यातल्या दोन स्टेप्स अगदी "flawlessly execute" झाल्या होत्या. तिसऱ्या स्टेप मध्ये फक्त माझी एकट्याची भूमिका होती आणि ती म्हणजे रूम मध्ये जाऊन ताणून द्यायची. झोप डोळ्यावर तरळत होतीच. तास हैदराबाद-पुणे ट्रेन प्रवास सोयीचा असला तरी मला ट्रेन मध्ये झोपणं हे म्हणजे कॅल्क्युलस सोडवल्यासारखं कठीण जातं त्यामुळे मी ह्या सरावाला बळी पडलो होतो. शिवाय - दुपारचं जेऊन झोपलं की वजन वाढतं ह्या फालतू कल्पनांना डोक्यात अजिबात थारा नं देता मराठी पाऊल पडते पुढे ह्या अविर्भावात बेडरूम मध्ये सरसावलो. 

"पडता क्षणी डोळा लागतो माझा" असं चारचौघात अगदी स्वाभिमानानं सांगणाऱ्या मला ही स्टेप एक्सिक्युट करणं म्हणजे काही अवघड नव्हतं. मी आत आलो आणि पाहिलं काम म्हणजे बाल्कनीचं दार लावून व पडदे लावून जितका जास्त काळोख निर्माण करता येईल तितका प्रयत्न केला. समोर गादी दिसत होतीच. गादी शेजारी म्हणजे अगदी हवी तशी झोपायची सर्व तयारी करून ठेवण्यात आली होती. आणि सर्व तयारी म्हणजे एक विक्स ची डबी. आमच्या घराण्यात अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना एक सवय (आई च्या म्हणण्याप्रमाणे "वाईट") आहे ती म्हणजे उठता बसता विक्स लावायचं. सर्दी झालेली असो किंवा नसो, विक्स हे जवळ हवंच . एकवेळ घरी तांदूळ संपतील पण विक्स च्या डबीत विक्स नाही असं होणे नाही. मी मस्त विक्स थापलं आणि डोक्यावरुन चादर घेऊन आता ह्या जगात काहीही घडलं तरी त्याबद्दल काहीही घेणं देणं नाही ह्या अविर्भावात मस्त विसावलो.  जरा डोळा लागतो नं लागतो तेच बाल्कनी मधून जोरजोरात म्हणजे अगदी एखादा पट्टीचा गायक जसा आरोह ते अवरोह आणि रिटर्न अशा स्वरात राग भक्ती करतो तसाच पण त्यापेक्षा अत्यंत बेसूर आणि चित्र विचित्र असे आवाज माझ्या कानात घुमून माझी तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली आणि सहन न झाल्याने मी डोक्यावरलं पांघरूण किंचितही न हालवता आतूनच हाक मारली

"बाबा!"

"काय रे" - बाबा लागलीच आत आले. माझ्या अजून डोळ्याला डोळा लागलेला नाहीये हे पाहून चक्क त्यांच्या डोळ्यांचा विश्वास बसेना. 

"तू अजून जागा?"

"अहो कसला आवाज येतोय तो?" डोक्यावरची चादर नं काढताच मी म्हणालो

"कसला आवाज येतोय? मला तर काही ऐकू येत नाहीये?" 

"अहो पक्षांचा ओरडण्याचा आवाज येत नाहीये का तुम्हाला?"

"अरे तो होय, पारवे आहेत!"

"असे कसे येऊन बसलेत" मी म्हणजे अगदी परवानगी कशी घेतली नाही. आणि आपलीच बाल्कनी कशी सापडली अशा स्वरात म्हणालो. 

"अरे समोर नवीन बिल्डिंग होतीये ना त्यामुळे तसं झालंय. शिवाय पुण्यात हे काही नवीन नाहीये सध्या. आपल्या सोसायटीत काही एवढा उपद्रव नव्हता आत्तापर्यंत इतकंच. पण आता एवढं कन्स्ट्रक्शन वाढलंय म्हणून सांगू त्यामुळे हे पारवे वाढलेत." बाबांच्या थिअरी ला कुठलाही बेस नव्हता हे म्हणजे त्यांची वाक्य सुरु होतानाच कळत होतं.

पुण्यात एकामागोमाग एक बनणाऱ्या नवीन ईमारती आणि हे पारवे ह्यांचं काय नातं आहे हे मला अजिबात उलगडलं नाही. आणि कन्स्ट्रक्शन वाढलं म्हणून पुण्याबाहेरची लोकं येऊन इथे स्थायिक झाली आणि त्यामुळे पुण्याची लोकसंख्या आणि महागाई अशा दोन्ही गोष्टी वाढल्या असे पोकळ वासे फुंकले जात होतेच पण हे मात्र कल्पनेपलीकडचं होतं. पण काहीही झालं तरी हे नक्की काय नातं आहे हे जाणून घेण्याची माझी काडीमात्र इच्छा नव्हती. माझ्यासमोर बँकेतील अकाउंटंट जसा मार्च एन्ड ला फक्त आणि फक्त एका गोष्टी बद्दल विचार करत असतो तसा  मी  फक्त आणि फक्त एकाच गोष्टी बद्दल विचार करत होतो ते म्हणजे ह्या दुपारच्या झोपेचं क्लोजिंग कसं करायचं. 

"बरं! ते जाऊदे, ह्यावर काही उपाय?"

"आहे ना!, दार उघडं ठेऊन फॅन लावायचा. फॅन ला ही जमात घाबरते. आणि दार उघडं ठेवलं कि जरी ते बाल्कनीच्या कोपऱ्यात रियाज करत असले तरी त्यांना पंखा दिसून त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन ते इकडे तिकडे पांगतात" बाबा म्हणजे असं बोलत होते कि कुठल्यातरी जालीम आजारावर आपण सखोल अभ्यास करून जाचक उपाय शोधून काढला आहे आणि ह्या पुढे होऊ शकणारा मानवजातीचा ह्रास कसा त्यामुळे टाळला आहे अशा काही अविर्भावात ते अगदी अभिमानानं सांगत होते. 

"हे तुम्ही कुठं वाचलंत ?"

"अरे परवाच्या सकाळला आलं होतं . माझे मित्र बापट, त्यांनी फोन करून सांगितलं पेपर आल्या आल्या. इतर काहीही वाचण्यापूर्वी पण नंबर १३ वरचा लेख वाचा म्हणून"

"अहो पण दुपारच्या वेळी सगळ्यांनीच हि प्रथा अवलंबली तर ही जमात कुठं जाऊन लपणार?" मी प्रश्न का विचारत होतो हे माझं मलाच ठाऊक.

बाबा अजून इतर कुठल्या वृत्तपत्राचा दाखला देणार तेवढ्यात मी म्हणालो - ठीके एक काम करा, ते उघड दार आणि लावा फॅन.

त्यांच्या ह्या उपायाचा काडीमात्र उपयोग होणार नव्हता हे माहीत होतं पण कालच्या प्रवासाचा शीण आणि दुपारी झालेलं जेवण ह्यानं उत्पन्न झालेली तीव्र झोपेची गरज भागवण्यासाठी जे काही करता येईल ते करायची माझी तयारी होती. 

बाबांनी गॅलरीचं दार उघडलं आणि फॅन लावला. हा सेटअप म्हणजे माझ्या नेहमीच्या सेटअप पेक्षा फार निराळा होता. जसं बाबांनी दार उघडलं तसं हा म्हणून सूर्य नारायण आत डोकावला आणि त्या रूम मधलं आधी जे काही दिसत नव्हतं ते दिसू लागलं म्हणजे अगदी डोक्यावर पांघरून घेऊन सुद्धा. तरी मी गेलेल्या झोपेला पुनः पाचारण करण्यासाठी डोळे झाकून प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण पूर्ण पंधरा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर कळून चुकलं की आपल्या प्रयत्नांना आज काही यश येणे नाही. 

मी डोक्यावरचं पांघरूण दूर नं सारता ही झोप परत आणण्यासाठी काय करता येईल ह्या उपायांची यादी करू लागलो. तेवढ्यात आमच्या मातोश्रींना पण ह्या घटनेची खबर लागून त्यांनी वेगळी चौकशी समिती नेमली आणि बाबांवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला त्यांच्या त्या आवाजानं पारवे राहिले बाजूला आधी ह्यांना बाहेर काढायला हवं असं मला वाटायला लागलं. आई म्हणजे नेहमी प्रमाणे विषयाला सोडून अजून बरंच काही डिटेल्स देत होती. म्हणजे अगदी पारवे सांडगे कसे खात नाहीत ह्या पासून त्यांना काय आवडतं काय नाही इत्यादी इत्यादी... म्हणजे ह्या प्रजाती बद्दल ह्या जोडप्याला एवढी कशी माहिती ह्याचा विचार करून त्यांनी हे किती सहन केलं असेल ह्या विचारानं मला जरा सहानभूती वाटली. मी डोक्यावरचं पांघरून काढून त्यांच्या त्या चर्चेत सहभागी झालो. 

"तू एक काम कर, आमच्या खोलीत जाऊन झोप. तिथं गॅलरी नाहीये त्यामुळे त्रास नाही" आईनं शेवटी अर्ध्यातासाच्या चर्चेनंतर उपयोगाची थोडी का होईना माहिती पुरवली 

मी त्यांच्याकडे वळूनही न बघता सरळ त्यांच्या रूम मध्ये रवाना झालो. पण तिथं पण काही यश येईना. तिथं काही वेळ प्रयत्न केल्यानंतर मी सरळ शरणागती पत्करून बाहेर हॉल मध्ये येऊन बसलो. 

आई आणि बाबांची चर्चा अजूनही चालू होती. मी एक पुस्तक उचललं आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. शेवटी त्यांच्या ह्या चर्चेचं रूपांतर भांडणात होऊन ती चौकशी समिती कोलमडली आणि बाबा बाहेर येऊन बसले.

"अगं चहा टाकतीस का ?" बाबांनी आधीच्या भांडणातून सुरु झालेल्या शीतयुद्धाच्या पूर्णविराम देऊन चर्चेसाठी पुढाकार घेतला. त्यांना इतक्या वर्षाच्या सवयीमुळे माहित होतं कि आपण जास्त अग्रेसिव्ह होऊन उपयोग नाही. 

तेवढ्यात आत भांड्यांचा आवाज झाला ह्यावरून हे कळलं की त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. मला आलेला प्रवासाचा शीण त्या चहानी जरा का होईना पण कमी झाला. 

"अरे हो बागवाडकर सहा पर्यंत येतायत" बाबा म्हणाले 

हे बागवाडकरांचं मी साफ विसरलं होतो. आता विरोध करून पण फारसा उपयोग नव्हता. म्हणजे घड्याळात पाच वाजले होते. ऐन वेळी कॅन्सल केलं असतं तर अगदीच बरं दिसलं नसतं म्हणून मी ठरवलं की लेट्स जस्ट प्ले अलॉन्ग . 

ठीक सहाच्या ठोक्याला ते बागवाडकर कुटुंब त्यांच्या कन्येला घेऊन दाखल झालं. औपचारिक ओळख परेड झाली आणि चर्चेला सुरुवात झाली. मी तिथे असूनही नं असल्यासारखा ते सगळं ऐकत होतो. अधून मधून फॉर्मॅलिटी म्हणून अगदी आक्वर्ड नको वाटायला म्हणून एक दोन वाक्य कसलेला बॅट्समन कसा कधी कधी गोलंदाजी करतो तसं बोलत होतो. 

"ह्या पारव्यांनी काय हैदोस घातलाय हो? तिकडे हैदराबाद ला आहे का हो हा त्रास?" बागवाडकरांनी म्हणजे ओळखीच्या आणि गंभीर विषयाला हात घातला. 

त्यांच्या ह्या वाक्यानी मला "जाग" आली. त्यानंतरचं सगळं संभाषण ते बागवाडकर आणि मी "पारवे" ह्या विषयावर व्यथित केलं. जोश्यांच्या चेहऱ्यावर पण साफ दिसत होतं की त्यांच्या झोपेचे पण बारा वाजले आहेत किंवा ते टपोरी भाषेत बोलायचं झालं तर "किती तोते उडाले आहेत". म्हणजे हा पारव्यांचा प्रश्न अगदी युनिव्हर्सल होता. बराच वेळ चर्चा करून बागवाडकर आणि कुटुंब बाहेर पडलं. मला त्या कुटुंबामध्ये त्यांच्या कन्येपेक्षा बागवाडकरच जास्त आवडले. आई आणि बाबांना पण ते जाणवलं आणि त्यांनी पुन्हा ह्याबद्दल विषय काढायचा नाही आणि जो हुआ सो हुआ - चलो आगे बढो हि नीती अवलंबली. 

संध्याकाळची जेवणं पार पडली आणि आतातरी ती आठ तासाची झोप नशिबात असावी अशा आशेनं मी रूम मध्ये आलो. आधी जसा हवा होता तसा सेटप मी केला आणि सरळ डोक्यावरून पांघरूण घेतलं आणि ताणून दिली. झोप लागते नं लागते तोच कुठूनतरी घोषणांचा चा आवाज येऊ लागला.

"बा अदब बा मुलाहिजा होशियार" एकदम आलेल्या ह्या घोषणेने पुन्हा जाग आली. उठून बघतो तर समोर एक मोठं सिहासन होतं. मला कळेना काय चाललंय ते. आजचा हा दिवसच थोडा विचित्र होता. 

झोप लागते नं लागते तोच कुठूनतरी घोषणांचा चा आवाज येऊ लागला. आता पुन्हा कोण माझी ही दुर्मिळ झालेली झोप मोडायला आलंय कळेना. पण आवाज पारव्यांचा नसून माणसांचा आहे आणि तो घटकेगणिक अधिकाधिक जवळ जवळ म्हणजे माझ्या पांघरुणाच्या दिशेनं येत आहे असं काहीसं ते होतं.

अचानक आवाज मोठा होतं गेला आणि मी वैतागून तोंडावरचं पांघरून पुन्हा एकदा दूर करून बाबांना आवाज देण्यार इतक्यात एकदम लक्ख प्रकाश माझ्या डोळ्यासमोर आला आणि मला क्षणभर अंधारी आल्यासारखं झालं. मी डोळे किलकिले करून बघितलं तर माझाच माझ्या डोळ्यांवर  विश्वास बसेना.   

आजूबाजूला बघतो तर पूर्ण दरबार होता आणि पुढ्यात एका ठराविक उंचीवर एक मोठं सिंहासन. कुठल्यातरी राजाच्या महालात आलोय असं काहीतरी वाटत होतं. 

“हे कोणाचं सिहांसन?” मी तिथं उभ्या असलेल्या द्वारपालाला विचारलं

"कोणाचं म्हणून काय विचारता?" एक द्वारपाल उत्तरला 

"हे आमचे महाराज, थोर योद्धे, थोरले बाजीराव पेशवे उर्फ राऊ यांचं आहे!" दुसरा द्वारपाल छाती फुगवून म्हणाला 

"म्हणजे? ते अजून हयात आहेत?" माझ्या ह्या प्रश्नानं काय कुणासठाऊक त्या दोन्ही द्वारपालांच्या चेहऱ्यावर असा का त्वेष अवतरला कि असं वाटलं की माझा इथेच शिरच्छेद होतोय की काय

"गुस्ताख माणसा!"  म्हणत दोनही द्वारपाल एकदम माझ्यावर धावले 

"माफ करा! गलती झाली" मी घाबरून म्हणालो. एवढं घाबरलेलो असताना सुद्धा "गलती" हा शब्द माझ्या तोंडून मलाच ऐकताना माझं मलाच हसू आलं. तेवढ्यात बाहेरून लोकांचा गदारोळ ऐकू आला आणि त्यातला एक द्वारपाल  

"दरबार सुरु होतोय त्यामुळे जर तुला तुझं धड प्रिय असेल तर उपकार कर आणि तिथे कोपऱ्यात एक शब्दही न उच्चारता उभा रहा. हा काय वेष परिधान केलायस! " द्वारपाल हळूच पुटपुटला. 

हळू हळू त्या दरबारात अगदी उंची जरीची वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे जशा आपण पुस्तकात किंवा हल्लीच्या मालिकांमध्ये अगदी तशा येऊन आपापल्या जागेवर स्थानापन्न झाल्या. ते सर्व बघून मला ह्या प्रकारच्या वस्त्रांचा किती तिटकारा आहे हे एकदम आठवलं. कुठलंही जवळच्या नातलगांमध्ये लग्न असेल तर आई नेहमी अरे जरा शेरवानी वगैरे घाल म्हणून नेहमी गळ घालते आणि माझं नेहमीचं ठरलेलं उत्तर म्हणजे "आई त्यात मला खूप उकडतं मी आपला पॅन्ट-शर्ट घालतो" त्यामुळे द्वारपालानं  "हा काय वेष परिधान केलायस" असं विचारल्यावर "मी इथं येणंच मला अपेक्षित नव्हतं तर येताना कुठली वस्त्र घालून यायची हे कसं माहीत असेल?" असं मला त्याला विचारावंसं वाटलं पण मी तो मोह टाळला. कोण जाणे परत त्याला मी हे बोललेलं आवडलं नसतं आणि त्यानं पुन्हा माझं धड शरीरापासून वेगळं करण्याची भाषा सुरु केली असती. 

मी आपला द्वारपालानं सांगितलेल्या कोपऱ्यात फक्त श्वासांची हालचाल जाणवेल इतक्या शांततेत तो सर्व सोहळा पहात उभा होतो. बघता बघता सर्व दरबार भरला पण ते मुख्य सिंहासन अद्याप रिकामंच होतं . मला ह्या सर्व अचंब्यात ही मात्र उत्सुकता नक्कीच लागून राहिली होती की ज्या सर्व श्रेष्ठ योध्याबद्दल इतकं वाचलं, ज्याबद्दल अजूनही इतकं बोललं जातं त्याला याची देही याची डोळा बघायला मिळणार का की हे द्वारपाल उगाच आपल्या बाता मारत आहेत. माझी उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती आणि तितक्यातच बाहेरून जोरात तुतारीच्या स्वरांनी सारा परिसर दणाणून निघेल इतका मोठा आवाज केला. तो होताच सर्व दरबार आपली ती जरीची वस्त्र सावरत उभं राहिलं. 

मला ज्यांनी हटकलं त्याच द्वारपालांनी जोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. एकदम "बा अदब बा मुलाहिजा वगैरे.." आणि शेवटी खरोखरच खुद्द बाजीराव पेशव्यांचं नाव घेतलं. ते ऐकून माझ्यासहित त्या दरबारातील प्रत्येक व्यक्ती डोळ्यात प्राण आणून त्या दरबाराच्या द्वाराकडे बघू लागली. घोषणा संपली आणि खरोखरच स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशी गोष्ट घडली. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टी एकीकडे आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांना त्या दरबाराच्या मधोमध आपल्या सिंहासनाकडे जाताना पाहणं एकीकडे असा तो एकंदरीत प्रसंग होता. हे सर्व शब्दात व्यक्त नं होण्यासारखंच होतं.

श्रीमंत सिंहासनावर स्थानापन्न झाले आणि पुढे काय होणार ह्याचीच एकंदरीत उत्सुकता लागून राहिली. ते सर्व बघून त्या द्वारपालानं "हा काय वेष परिधान केलायस?" हे वाक्य आठवलं आणि मी इतरांना दिसणार नाही असा अंग चोरून कोपऱ्यात उभा राहिलो. औपचारिक मुजरे पार पडले आणि कारभाराला सुरुवात झाली. श्रीमंत एकामागून एक उपस्थित झालेलं मुद्दे अगदी सराईतपणे हाताळत त्यावर तोडगे काढत होते हे म्हणजे आजकालच्या राज्यकर्त्यांसाठी एक दृष्टान्त होता. पहिले एक-दोन मुद्यांवर चर्चा संपन्न झाल्यावर निजामाचा मुद्दा निघाला आणि श्रीमंत एकदम गंभीर झाले. विषय होता निजामाच्या चाललेल्या हरकतींना लगाम कसा घालायचा. दरबारातील काही उच्च पदावरील लोकांनी एकंदरीत परिस्थिती समजावून सांगितली त्यावर श्रीमंत कडाडले आणि म्हणाले ह्या निजामाला धडा शिकवायलाच हवा आणि त्यासाठी लवकरच निजामावर चालून जाण्याशिवाय पर्याय नाही. ते ऐकून दरबारातील सर्व जनतेने "जय भवानी" चा जल्लोष केला. त्यात साहजिकच मीही सामील झालो. 

तितक्यात एका व्यक्तीने फंद -फितुरी वाढल्याची आणि निजामाची लोकं हल्ली पुणे आणि आसपासच्या परिसरात वेष बदलून राहत असल्याची शिवाय दरबारापर्यंत हजेरी लावत असल्याची माहिती श्रीमंतांना पुरवली. ते ऐकून श्रीमंतांच्या डोळ्यात निर्माण झालेले आगीचे निखारे बघून दरबारातील जनतेला भीती वाटली नसती तरच नवल. ते ऐकून श्रीमंतांनी तशी परिस्थिती आढळल्यास कुठलीही तमा नं बाळगता त्या माणसांना कठोर शिक्षा करावी असे आदेश दिले.

"या दरबारात जर अशी कुठली व्यक्ती असेल कि जी हैद्राबादेहून आली आहे आणि वेष बदलून वावरत आहे तिने आपली शेवटची इच्छा व्यक्त करण्यास ताबडतोब समोर यावे" श्रीमंत पुन्हा कडाडले. 

हे ऐकताच मला दरदरून घाम फुटला. आता श्रीमंतांना कसं सांगणार कि मी हैदराबाद ला राहतो आणि नित्यनेमाने पुण्यात माझं येणं-जाणं असतं.  मला काय करावं कळेना. गप्प राहिलो असतो आणि पकडलो गेलो असतो तर खैर नव्हतीच. पण समोर जाऊन तशीही श्रीमंतांना शेवटची इच्छा सांगावी की प्रामाणिकपणे स्वतःची बाजू मांडावी ह्या दुविधेत माझं मन गुंतलं.

"ही शेवटची संधी समजावी नाहीतर आमची समशेर आणि त्या व्यक्तीची भेट होण्यावाचून गत्यंतर नाही" श्रीमंत म्हणाले

"श्रीमंत माझी एक मसलत आपण हाती घ्यावीत म्हणून मी इथे आलो आहे" मी म्हणालो. माझ्या ह्या वाक्याने दरबारातल्या समूहात एकच हशा पिकला. आजवर कदाचित श्रीमंतांना कुणी मसलत देऊ केली नसावी आणि ते श्रीमंत स्वतः ठरवत असावेत ही ह्या हशावरून एकंदरीत कल्पना आली. मी आपलं आधी वाचलेल्या पुस्तकांमधली पेशवेकालीन भाषा आठवून आठवून वापरायचा जमेल तितका प्रयत्न करत होतो. 

तितक्यात "खामोश" असा आवाज आला. आणि दरबारात "पिन ड्रॉप" म्हणावी तशी शांतता निर्माण झाली. 

"बोल काय बोलायचंय तुला" श्रीमंतांनी ग्रीन सिग्नल दिला आणि मी भडाभडा सगळं सर्व खरं खरं सांगितलं. मी कसा नोकरीला आहे इथपासून मी इथे का आलो असावो इथपर्यंत आणि ह्यात पुण्यात सध्या धुडगूस घालत असलेल्या पारव्यांचा कसा हात आहे. सगळं सगळं. आणि सर्वात शेवटी श्रीमंतांनी ही पारव्याची मसलत हाती का घ्यावी आणि झोपेपासून वंचित राहिलेल्या पुणेकरांना त्यांची हक्काची नुसती रात्रीचीच नाही पण दुपारची वामकुक्षी देऊ करावी ह्याबाबत साकडं घालण्यासाठी मी इथे आलो असावो असा माझा कयास आहे आणि आपण ही मसलत हाती घेतल्याशिवाय मी निरोपाचे विडे घेणार नाही असं बोलून मी थांबलो. ते ऐकून दरबारात पुन्हा एक हशा पिकला आणि मी पुन्हा माझं पुस्तकी वाक्य अनाहूतपणे फेकलं होतं हे जाणवलं. 

"खामोश" पुन्हा आवाज झाला. 

दरबारात पुन्हा एकदा शांतता निर्माण झाली. श्रीमंतांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छटा हे सगळं ऐकून दिसत होती. हे सगळं ऐकून श्रीमंत आपला वध करणार नाहीत ह्याची थोडीफार शक्यता निर्माण होताना दिसली आणि थोडावेळ का होईना मला जरा हायसं वाटलं. 

"तुझा प्रामाणिकपणा मला आवडला" श्रीमंत म्हणाले. हे ऐकून तरी आपण आज इथून जिवंत परत जाणार ह्यावर खात्री पटली. 

"घेऊ तुझी मसलत आम्ही हाती. गणपतीच्या आधीच निजामाला आणि पुण्यातल्या पारव्यांना दोघांना निकालात काढू" असं म्हणून श्रीमंत उठले आणि वाऱ्याच्या वेगात द्वाराच्या दिशेने चालते झाले. सर्व जनतेने "जय भवानीचा" पुन्हा जल्लोष केला. जाता जाता दरबारातील सर्व जनता मुजऱ्यासाठी वाकली. मी ही वंदन केलं. शेवटी काही का होईना श्रीमंतांनी माझी ही पारव्याची मसलत स्वीकारली होती. सर्व पुणेकरांच्या झोपेचा प्रश्न हा माझ्या हातून सुटेल हे अजिबात देखील वाटलं नव्हतं. कोणाच्या हातात देवानं काय काम नेमून दिलं असावं काय सांगावं. 

पण वंदन करून पुन्हा उभा राहून बघतो तर मी माझ्या रूम मधे गॅलरीकडं वाकून उभा होतो. अचानक त्या भव्य दरबाराचं रूपांतर माझ्या छोट्याशा खोलीत झालं होतं. मी चमकून इकडं तिकडं पाहिलं आणि एकदम मी भानावर आलो. हे सगळं स्वप्न होतं ह्याची खात्री पटली. मी काहीही नं विचार करता पुन्हा झोपी गेलो.  

सकाळी आईनं हाकांचा गजर सुरु केला होता. किती उशिरापर्यंत झोपायचं ते, चहा तयार आहे आणि लवकरच नाश्ता पण तयार होईल. पुढच्या पंधरा मिनिटात उठला नाहीस तर कपडे स्वतःचे स्वतः धुवावे लागतील. धुणंवाल्या बाई आज लवकर येणार आहेत. त्यांना लग्नाला जायचंय. पण अशा प्रकारच्या तंबी यायला सुरुवात झाली होती. मी विचार केला श्रीमंतांच्या दरबारातला जरब सुद्धा यापेक्षा कमी होता.

"हो उठलोय" मी डोळे चोळत म्हणालो. 

"काय रे झोप लागली का काल?" बाबांनी विचारलं 

"हो चांगलीच" मी पांघरुणाच्या घड्या करत उत्तरलो 

एकदम मला ते कालचे स्वप्नातले प्रसंग आठवू लागले. तो दरबार, श्रीमंतांचा जरब, त्यांची ती तेजस्वी छबी आणि एकंदरीत वावर सारखा डोळ्यासमोर येत होता. ज्यासाठी एवढा खटाटोप करून खुद्द थोरल्या बाजीरावांना साकडं घातलं ते सर्व स्वप्न ठरावं ह्यामुळं दुःख तर झालंच पण त्याहीपेक्षा पारव्यांचा प्रश्न सुटला असता तर कीती बरं झालं असतं असं राहून राहून वाटत होतं.

या सर्व कालच्या स्वप्नाच्या उजळणी मधलं श्रीमंतांचं एक वाक्य ध्यानात आलं आणि मी आईला विचारलं "काय गं गणपती कधी आहेत या वेळेला?"

"आहेत अजून अडीच महिने तरी" आई कॅलेंडर बघत म्हणाली 

माझं मन हे सगळं स्वप्न होतं ह्या गोष्टीला अजूनही पूर्णतः मान्य करायला तयार नव्हतं आणि मी जाहीर केलं की यापुढं गणपतीपर्यंत मी दार वीकएंड ला पुण्याला नं चुकता येणार. कुठंतरी माझं मन सांगत होतं की श्रीमंतांनी ही "पारव्याची मसलत" स्वीकारली आहे आणि ते ही पूर्ण करणार म्हणजे करणारच.

Thursday, August 28, 2008

My lonely/only....stillwater

As I look at this picture...in a retrospective way...trying to evaluate how this ,other part of world forced to change me...forced me to grow...
This picture always makes me feel....i am alone...and how stilly made me to be like this...
I like stilly ...its my fav town after Pune..but still..stilly forced me to think about others...about the ones u love...u care...and as I look back...thru this picture...I state...how crowded is this world...and how empty the space in between each person...
Its about stilly...my own..my dearest....but lonely...scary...on the dark side...
(Snap taken by upendra)